पुणे – मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मार्गिकेमधील शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा मार्ग भुयारी असणार आहे. अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागातून जाणारा हा मार्ग शिवाजीनगर बस स्थानक, सिव्हिल कोर्ट, बुधवार पेठ, महात्मा फुले मंडई आणि स्वारगेट या शहराच्या महत्वपूर्ण ठिकाणांना जोडणार आहे.
या भुयारी मार्गाच्या कामासाठी ३ टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येत असून त्यांनी आत्तापर्यंत ७ किमीचा (१२ किमी पैकी) भुयारी मार्ग बनविला आहे. २ टनेल बोरिंग मशीनच्या सहाय्याने कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्गाचे कामाचा प्रारंभ करण्यात आला होता, तर १ टनेल बोरिंग मशीन स्वारगेट येथून मंडईच्या दिशेने काम करत आहे.
आज दिनांक २२ जुलै २०२१ रोजी कृषी महाविद्यालय येथून भूमिगत मार्ग बनविणारे टनेल बोरिंग मशीन बुधवार पेठ येथे पोहचत आहे. मेट्रो कामाच्या भाषेत यास ‘ब्रेक थ्रू’ असे म्हंटले जाते. कृषी महाविद्यालय येथून २९/११/२०१९ रोजी पहिले टनेल बोरिंग मशीन “मुठा” व ३०/११/२०२१ रोजी दुसरे टनेल बोरिंग मशीन “मुळा” ने कामाला प्रारंभ केला, आजमितीस सिव्हिल कोर्ट स्थानक पार करून मुठा नदीच्या खालून बुधवार पेठ येथे “मुठा” टनेल बोरिंग मशीन पोहचत आहे. पुणे मेट्रोच्या कामाचा हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. दुसरे टनेल बोरिंग मशीन “मुळा” लवकरच बुधवार पेठ स्थानकात पोहचणार आहे.
पुणे हे भारतातील चौथे शहर आहे जेथे भूमिगत मेट्रो मार्ग नदीच्या खालून जात आहे. याआधी मुंबई (मिठी नदी), कलकत्ता (हुगळी नदी), आणि चेन्नई (कुम आणि अद्यार) या महानगरांमध्ये टनेल बोरिंग मशीनने भूमिगत मेट्रोसाठी नदीच्या खालून बोगदा बनविण्यात आला आहे. मुठा नदीच्या खालून जाणारा बोगदा सुमारे ३३ मीटर खोल असून, नदी पात्राच्या तळापासून साधारणतः १० मीटर खालून जात आहे.
आज पुणे मेट्रोचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड ते दापोडी या मार्गावर मेट्रो ट्रेन चालवण्याची चाचणी १ वर्षांपूर्वी घेण्यात आली होती. याच मार्गाचे ४ जुलै २०२१ रोजी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी यांनी निरीक्षण केले. त्यामुळे तेथे मेट्रो सेवा सुरु करण्यासाठी लागणाऱ्या परवानगीच्या दिशेने सुरुवात झाली आहे. कोणत्याही मेट्रो मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु करण्यासाठी कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी यांची परवानगी अनिवार्य असते. मेट्रोची दुसरी मार्गिका जी कोथरूड (वनाझ)येथून देखील मेट्रोची चाचणी ७ जुलै रोजी घेण्यात आली. जसे जसे काम पूर्णत्वाकडे जाईल तशी वनाझ ते गरवारे पर्यंत मेट्रो चालवण्याची चाचणी घेण्यात येईल.
या प्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी म्हंटले आहे कि, ‘महामेट्रो लवकरात लवकर पुणे मेट्रो सुरु करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी मेट्रोची उभारणी अत्यंत वेगाने सुरु आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, इतर सर्व शासकीय संस्थाच्या सहयोगामुळे आणि पुणेकरांच्या उस्फुर्त सहभागामुळे महामेट्रोने हा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे.’ या प्रसंगी महामेट्रोचे तांत्रिक सल्लागार श्री. शशिकांत लिमये, (IRSE) उपस्थित होते. पुणे मेट्रोच्या अत्यंत कठीण अशा तांत्रिक व गुंतागुंतीच्या डिझाईनसाठी श्री. लिमये यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.