ओमिक्रॉनचे संकट! मोदी सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नियमावली जाहीर; ‘असे’ असतील नवे नियम

नवी दिल्ली : आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये करोनाच्या  नव्या व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग जगभरात झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळेच मोदी सरकारने यावेळी सावध भूमिका घेत देहसभरात पुन्हा एकदा निर्बध लादण्याची तयारी सुरु केली आहे. यातील पहिला मोठा आणि महत्वाचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. आरोग्य मंत्रालयाने भारतात येणाऱ्या विदेशी प्रवाशांसाठी नियमावली जाहीर केली आहे.

सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नवीन  नियमावली १ डिसेंबरपासून लागू होणार आहे. यानुसार विदेशी प्रवाशांना आपल्या १४ दिवसांच्या प्रवासाची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच प्रवासाआधी एअर सुविधा पोर्टलवर आपला निगेटिव्ह आरटीपीआर टेस्ट रिपोर्ट टाकणे  बंधनकारक असणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीनुसार, धोका असणाऱ्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर करोना चाचणी केली जाईल. तसेच या चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत या प्रवाशांना विमानतळावरच थांबावे लागणार आहे. जर रिपोर्ट निगेटिव्ह आला तर त्यांना सात दिवसांसाठी विलगीकरणात राहण्याची प्रक्रिया पाळावी लागेल. आठव्या दिवशी पुन्हा चाचणी करण्यात येईल. त्यावेळीही रिपोर्ट निगेटिव्ह आला तर  स्वत: सात दिवसांसाठी काळजी घ्यावी लागेल.

ज्या देशांमधून धोका नाही तेथील प्रवाशांना विमानतळावरुन जाण्याची परवानगी देण्यात येईल. मात्र त्यांनाही १४ दिवस लक्ष ठेवावे लागणार आहे. एकूण प्रवाशांच्या पाच टक्के प्रवाशांची विमानतळावर चाचणी केली जाईल.

शनिवारी केंद्राने अनेक देशांना धोका असणाऱ्या यादीत टाकले आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिका, चीन, बोत्सावना, युके, ब्राझिल, इस्त्राईल, बांगलादेश, मॉरिशिअस, न्यूझीलंड, झिम्बॉम्बे, सिंगापूर आणि हाँगकाँग यांचा समावेश आहे.

‘ओमिक्रॉन’चा प्रादुर्भाव वाढत असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी रविवारी तातडीची बैठक घेतली. बैठकीत १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू करण्याबाबत फेरविचाराचा निर्णय घेण्यात आला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.