पुणे – करोनाची लागण झालेला आणि गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन)मध्ये असणारा रुग्ण बाहेर फिरताना दिसल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. त्याची त्वरित पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे.
करोनाची लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले 85 टक्के रुग्ण घरातच विलगीकरणात राहत आहेत. मात्र, विलगीकरणाचा कालावधी संपण्यापूर्वीच काहीजण घराबाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांवर नियमित देखरेख ठेवण्याचे नियोजन केले आहे.
या रुग्णांना लक्षणे नसली तरी ते करोनाचे प्रसारक ठरू शकतात. त्यामुळे त्यांनी घरातच राहणे बंधनकारक आहे. असे असतानाही ते बाहेर फिरून करोनाचा प्रादुर्भाव वाढवत असल्याने त्यांच्यावर थेट फौजदारीच कारवाई केली जाणार आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यासाठी आरोग्य विभागाने 15 डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली पथकांची नियुक्ती केली आहे. क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे, असेही डॉ. भारती यांनी सांगितले.