रस्त्यावर पाणी टाकणाऱ्यांवर होणार आता फौजदारी..!

महापालिका प्रशासनाचे नागरीकांसाठी फर्मान

नगर (प्रतिनिधी) – शहरातील बहुतेक भागांत सध्या रस्त्यांचे डांबरीकरण व पॅचींग सुरु आहे. मात्र, काही ठिकाणी नागरीकांकडून याच नवीन कामांवर पाणी टाकले जात असल्याने रस्त्यांची पुन्हा तातडीने दुरावस्था होत आहे. सबब, रस्त्यांवर पाणी टाकणाऱ्यांविरुद्ध यापुढे महापालिका फौजदारी स्वरुपाची कारवाई करेल, अशी तंबी आज महापालिका प्रशासनाने दिली आहे.

महापालिका आयुक्‍तांच्या आदेशानुसार आज प्रसिद्धी विभागाने तसे पत्रकच जारी केले आहे. दोन महिन्यांपासून नगरमधील बहुतेक रस्त्यांचे पुन्हा मजबुतीकरण सुरु करण्यात आले आहे. पावसाळ्यानंतर उखडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती सुरु आहे. महापालिकेने गेल्या दोन महिन्यांत या संदर्भात केलेल्या पाहणीत नव्या रस्त्यांवर कामे सुरु करताना किंवा पूर्ण झाल्यानंतरही काही भागांतील स्थानिक नागरीक, रस्त्यावरील दुकानदार पाणी टाकताना आढळून आले आहेत.

नागरीकांच्या या निष्काळजीपणामुळेच रस्ते दुरुस्तीसाठी करण्यात आलेले पॅचींग तसेच डांबर व खडी टाकून केलेले रोलींग काही तासांतच पुन्हा खराब होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

वास्तविक, पाणी व डांबराचे तांत्रिकदृष्ट्या वितुष्ट आहे. नवीन केलेल्या डांबरीच्या पायामध्ये पाणी गेल्यास त्यातील खडी रस्ता सोडून देते. तसेच रस्ताही लगेचच खराब होतो. पर्यायाने रस्त्याच्या कामाचे श्रम व पैसा देखील वाया जातो. तसेच अगदी कमी कालावधीतच रस्ता पुन्हा खराब झाल्याने नागरीकांच्याच रोषालाही बळी पडावे लागले, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने आदेशात स्पष्ट केली आहे.

दरम्यान, यासंदर्भात गुलमोहर रस्ता व शहरातील काही भागांत यापूर्वीही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तरी देखील नागरीकांत सुधारणा होताना दिसून आलेली नाही. त्यामुळे आता यापुढे असे प्रकार आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल. त्यानंतरही सुधारणा न झाल्यास यापुढे फौजदारी स्वरुपाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

कुष्ठधाम रस्त्यावर दुर्लक्ष का?

रस्त्यावर पाणी टाकणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणाऱ्या महापालिका प्रशासनाचे कुष्ठधाम रस्त्यावरील अशाच प्रकाराकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. कुष्ठधाम रस्त्यावर वाहने धुणाऱ्या एका वॉशिंग सेंटरकडून पाणी सोडले जात आहे.

त्या संदर्भात रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारानेच लेखी स्वरुपात महापालिका प्रशासनाला अवगत केलेले आहे. रितसर तक्रार दाखल असुनही महापालिका प्रशासनाने साधी चौकशी देखील केलेली नाही. त्यामुळे असा इशारा म्हणजे निव्वळ गंमत असल्याची नगरकरांची भावना आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.