उंब्रज – करोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशांचे व कायद्यांचे उल्लंघन करू नये, अशा सूचना देणारे शिरगाव, ता. कराड येथील सरपंच रामचंद्र कृष्णा सुतार (वय50) यांना शाहू सयाजीराव पाटील व श्रीकृष्ण उर्फ गोप्या सयाजीराव पाटील यांनी काल (दि. 5) सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाणआणि जीवे मारण्याचीधमकी देत चाकूहल्ला केला.
या प्रकरणी दोघांवरकराड तालुका पोलीसठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.प्रशासनाच्या सूचनेनुसार करोनाच्या प्रतिबंधासाठी फवारणी करायची आहे. ग्रामस्थांनी मास्क न वापरता गावात फिरू नये, कायदे व नियमांचे उल्लंघन करू नका, अशा सूचना सरपंच रामचंद्र सुतार हे दि. 1 रोजी देत होते.
त्यावेळी गावातील शाहुराज पाटील व त्याचे चार मित्र मारुती मंदिरासमोर घोळका करून बसले होते. त्यांना एकत्र बसू नका, असे सुतार हे सांगत असताना शाहुराज याने अरेरावी केली. तुला उद्या दाखवितो, सरपंचपदाचा माज काढतो, असे म्हणून सुतार यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्याला समजावून सांगून सुतार हे निघून गेले. गावात दि. 3 रोजी जंतुनाशक फवारणी झाली. त्यावेळी शाहू पाटीलने सुतार यांचा मुलगा शुभम याला शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर सुतार हे काल कुटुंबीयांसमवेत शेतात असताना शाहू पाटील व गोप्या पाटील हे मोटारसायकलवरून तेथे आले आणि दोघांनी सुतार यांच्यावर चाकूहल्ला करून मारहाण केली. सुतार यांच्या पत्नीलाही दोघांनी शिवीगाळ करून ढकलून दिले. या प्रकरणी सुतार यांनी फिर्याद दिली आहे.