चाकणमधील दाम्पत्यास जीवे ठार मारण्याचीही धमकी
महाळुंगे इंगळे- व्याजाच्या रकमेपोटी दुप्पट रक्कम वसूल करत शिवीगाळ, दमदाटी करून 13 एकर जमीनीचे जबरदस्तीने खरेदीखत करून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी बुधवारी (दि. 13) पुण्यातील खराडी येथील दोन बड्या खासगी सावकारांवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांनी दिली.
धीरज धनाजी पठारे व उमेश उर्फ दादा खंडू खांदवे (दोघेही रा. खराडी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर याप्रकरणी नंदा प्रताप खांडेभराड (वय 47, रा. कडाचीवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नंदा खांडेभराड व त्यांचे पती प्रताप खांडेभराड यांना 10 टक्के व्याजदराने दिलेले 1 कोटी 20 लाख रुपयांचे 12 लाख रुपये प्रती महिना याप्रमाणे 15 महिने व्याजापोटी 1 कोटी 80 लाख व त्यानंतर 31 लाख रुपये असे 2 कोटी 11 लाख रुपये व्याजवरील दोघांनी जबरदस्तीने घेतले. रांजणगाव व ढोक सांगवी येथील 13 एकर जमीन धमकावून खरेदीखत करून घेतले. त्याचप्रमाणे वरील दोघांनी वेळोवेळी खांडेभराड यांना चाकण येथील घरी येऊन शिवीगाळ, दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
- चाकण भागात खासगी सावकारी जोमात
उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण भागात जमिनींना सोन्याचा भाव आल्याने पंचक्रोशीत खासगी सावकारी जोमात सुरू झाली आहे. त्यामुळे भांडणे, मारामाऱ्या, धमक्या देणेही आता नित्याचीच बाब बनत चालली आहे. यापूर्वीही असे प्रकार समोर आले असून, यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जावू लागला आहे.