सोलापूर – वर्गणी देण्यास नकार दिल्याने दोघांना कोयत्याने हल्ला करून जखमी केले. हा प्रकार अशोक चौक परिसरातील झोपडपट्टीत शुक्रवारी रात्री 11 वाजता घडला. बिस्मिला इक्बाल बागवान (48) व यासिन इक्बाल बागवान (21, दोघे रा. अशोक चौक, सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.
यातील जखमी हे त्यांच्या राहत्या घराजवळ असताना, भैय्या धोत्रे व इतर चार जण तेथे आले. त्यांनी जखमींकडे वर्गणीची मागणी केली. त्यास नकार दिल्याने चिडलेल्या भैय्या धोत्रे व त्याच्या साथीदारांनी लोखंडी सळई, लाकडाने तसेच कोयत्याने मारहाण केली.
दोघांना सर्वांगास मुका मार लागल्याने ते स्वत: मध्यरात्री सिव्हिल रुग्णालयात उपचारास दाखल झाले. सिव्हिल पोलिस चौकीत घटनेची नोंद आहे.