- सराईत गुन्हेगारांना हाताळण्यास पोलीसही हतबल
- गुन्हेगारी क्षेत्रात नव्याने आलेल्यांचा सामना करण्याचे आव्हान
पुणे- शहर अनलॉककडे जात असताना करोनाबरोबरच गुन्हेगारीचा आलेखही वाढत आहे. करोणाची परिस्थिती हाताळण्यास प्रशासन जसे हतबल झाले आहे, तसेच गुन्हेगारांना हाताळण्यास पोलीसही हतबल झाल्याचे चित्र दिसत आहेत. पोलिसांसमोर आता सराईत गुन्हेगारांबरोबरच परिस्थिनीने गुन्हेगारीत आलेल्यांचा सामना करण्याचे आव्हान समोर ठाकले आहे.
गुन्हेगारीचे प्रमाण दखल घेण्याजोगे
लॉकडाऊमध्ये नोकरी, रोजगार आणि व्यवसायात मोठा फटका बसलेले अनेकजण नाईलाजास्तव गुन्हेगारीकडे वळत आहेत. हे प्रमाण नगण्य असले, तरी सराईत गुन्हेगार आणि नव्याने दाखल झालेले गुन्हेगार यांची सांगड घालता प्रमाण नक्कीच दखल घेण्यासारखे आहे. “लॉकडाऊन’ काळात करोना योद्धा म्हणून लढणाऱ्या पोलिसांना आता पुन्हा एकदा नव्याने उद्भवणाऱ्या गुन्हेगारीशी लढण्यास सज्ज राहावे लागणार आहे.
…इथं जीवन-मरण्याचा प्रश्न
सलग काही महिने अनलॉकमध्ये राहिल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांसमोर जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. शहरे हळूहळू अनलॉक होत असले, तरी मागील काही महिने बसलेला आर्थिक फटका पुढील काही महिने भरुन येणे तरी अशक्य दिसत आहे. सध्या मध्यम आणि उच्च वर्गाकडे जीवन जगण्यासाठी पुरेशी साधने असल्याने त्यांना कोठेच तडजोड करण्याची गरज भासताना दिसत नाही. मात्र हातावर पोट असणारे, छोटे-मोठे व्यवसाय असणारे आणि किरकोळ नोकरी करणाऱ्यांसमोर जगण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यातूनच मानसिक ताण-तणाव प्रचंड वाढत आहे. याचा परिणाम म्हणून काही पावले आत्महत्येकडे, तर काही गुन्हेगारीकडे वळताना दिसत आहेत.
गुन्हेगार दिवसेंदिवस आक्रमक
साधारणपणे दरवर्षी राज्याच्या काही भागांत दुष्काळ पडल्यानंतर तेथील स्थानिक गुन्हेगारांची पावले शहरांकडे वळतात. उदा. दरवर्षी गणेशोत्सवात परराज्य अथवा परजिल्ह्यांतूनही मोबाइल आणि सोनसाखळी चोरांच्या टोळ्या दाखल होतात. तशीच काहीशी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाल्याचे दिसत आहे. मागील दीड-दोन महिनाभरातील गुन्हेगारीचा लेखा जोखा बघता रस्त्यावरील गुन्हेगारीत प्रचंड वाढ झालेली दिसत आहे. यातही विशेष म्हणजे गुन्हेगार जास्तीत जास्त आक्रमक बनत आहेत.
…थेट जीवघेणे हल्ले
अगदी हजार दोन हजार रुपयांचा मोबाइल हिसकावतानाही मारहाण आणि हत्याराने वार केले जात आहेत. गुन्हा करताना सापडल्यास कोर्ट-कचेरी आणि जामिनासाठी पैसा कोढून आणायचा? हा प्रश्नही कदाचित त्यांच्या पुढे उभा असेल. यामुळे कोणाच्या हाती लागू नये, यासाठी त्यावर जीवघेणा हल्ला करण्यासही मागे पुढे पाहिले जात नाही. या लुटमारीच्याच एका घटनेत स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. तर एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या बोटावर निभावले.
आणखी गंभीर परिणाम जाणवू शकतात
सध्यातरी बेरोजगारीतून किंवा लॉकडाऊनचा परिणाम म्हणून गुन्हेगारी वाढताना दिसत नाही. मागील चार-पाच महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे स्थानिक गुन्हेगारांना गुन्हे करता आले नव्हते. लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता आणली गेल्याने जनजीवन सुरळीत झाले आहे. यामुळे स्थानिक गुन्हेगार पुन्हा एकदा सक्रीय झाले आहेत. याचाच परिणाम म्हणून अचानक स्ट्रीट क्राइमसारखे गुन्हे वाढल्याचे दिसत आहे. मात्र, भविष्यात लॉकडाऊनचे परिणाम आणखी गंभीरपणे जाणवू शकतात, असे एका एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.