पुणे(प्रतिनिधी) – खुनी हल्ला करुन फरार झालेला आरोपी दत्तवाडी पोलिसांना थेट दहा वर्षानीच हाती लागला. तो दहा वर्षे पुणे शहर व इतर ठिकाणी राहून पोलिसांना गुंगारा देत होता. मित्राच्या बहिणीची चेष्टा मस्करी केल्याच्या कारणावरुन त्याने साथीदारांच्या मदतीने एकावर खुनी हल्ला केला होता.
अभिषेक उर्फ गुड्डू जगन्नाथ भालेराव(29, रा. पर्वती पायथा ) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुड्डू भालेराव याने त्याचा मित्र विशाल गायकवाड, पिंटू भालेराव, योगेश शिंगाडे व इतर सहा ते सात जणांच्या मदतीने 10/5/2011 रोजी हा गुन्हा केला होता.
मित्राच्या बहिणीची चेष्टा मस्करी केल्यामुळे त्याने वसंत कांबळे याच्या तोंडावर, डोक्यावर कोयता मारुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून गुड्डू सापडत नव्हता. त्याचे इतर साथीदार मात्र पोलिसांच्या हाती लागले होते.
दरम्यान तो मागील काही दिवस पुणे शहरातच वेगवेगळ्या ठिकाणी राहून पोलिसांना गुंगारा देत होता. तो नीलायम टॉकीज जवळ उभा असल्याची खबर पोलीस अंमलदार शिवाजी क्षिरसागर व राहुल ओलेकर यांना मिळाली होती. त्यानूसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
आपल्याला कोणी ओळखणार नाही असे त्याला वाटत होते, पण….
गुड्डूने गुन्हा केल्यावर त्याचे कुटूंब गावाकडे निघुन गेले होते. यानंतर गुड्डूही गावाकडे जाऊन काही दिवस राहिला होता. पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करत होता. इतक्या वर्षात त्याने विवाहही केला नाही. दरम्यान वयानुसार त्याच्या चेहरे पट्टीतही बदल झाला होता. यामुळे पुन्हा पुण्यात आल्यावर आपल्याला कोणी ओळखणार नाही असे त्याला वाटत होते. दरम्यान मागील काही दिवस तो आपल्या ओळखीच्या मित्रांना भेटून गेला होता. याची खबर पोलिसांना लागली होती. त्यानूसार त्याच्यावर पाळत ठेऊन ताब्यात घेण्यात आले.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक विजय खोमणे, उपनिरीक्षक स्वप्निल लोहार, पोलीस हवालदार सुधीर घोटकुले, कुंदन शिंदे, राजु जाधव, महेश गाढवे, पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, शरद राऊत, नवनाथ भोसले, अक्षयकुमार वाबळे, अमित सुर्वे विष्णु सुतार यांच्या पथकाने केली.