पुणे – अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत तिचा विनयभंग करणाऱ्या अमोल घाटे (वय 19) यास न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला.
दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. ही घटना ऑक्टोंबर 2018 आणि त्यापूर्वीच्या दोन महिन्याच्या कालवधीत हडपसर भागात घडली. या प्रकरणी 14 वर्षीय मुलीने पोलिसात फिर्याद दिली आहे.
अमोल याने अल्पवयीन पिडीतेचा पाठलाग करून “मी तुझा मित्र असून मी तुला खुप लाईक करतो. मी माझा मोबाईल नंबर देतो त्याच्यावर व्हॉटसऍपला हाय म्हणून मॅसेज पाठव. उद्या भेटू असे म्हणून पाठलाग करत विनयभंग केल्याचे फिर्यादित नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
पोलिसांनी त्याच्याविरोधात तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. त्यामध्ये त्यांनी सहा साक्षीदार तपासले. याप्रकरणात पीडिता व तिच्या मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली.
गुन्ह्याचा तपास हडपसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गावडे यांनी केला. त्यांना न्यायालयीन कामकाजात पैरवी अधिकारी आर. एन. कांबळे यांनी मदत केली.