चाकण -दाक्षिणात्य चित्रपट, क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया, अश्लील व्हिडिओ पाहून नात्यातील अल्पवयीन मुलाने भामा-आसखेड परिसरातील थोपटेवाडी (ता. खेड) येथील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून तिची निर्घृण हत्या केल्याचे चाकण पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलास अटक करून पीठासीन अधिकारी बाल न्याय मंडळ येरवडा पुणे, यांच्या समक्ष हजर करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी दिली.
अल्पवयीन मुलाने वरील अल्पवयीन मुलगी आपल्याला वारंवार टोमणे मारत हिणवत होती. तसेच इतरांशी चांगले बोलते पण आपल्याशी नीट बोलत नाही याची चीड व संताप होता, त्यामुळे आपण तिचा काटा काढला असल्याची अल्पवयीन मुलाने पोलिसांकडे कबुली दिली. दरम्यान, अल्पवयीन मुलगी शुक्रवारी (दि. 24) बेपत्ता झाल्यानंतर तिची शोध मोहीम सुरू होती. त्यात आरोपीही सहभागी झाला होता. तर मुलीचा मृतदेह मामाच्या निदर्शनास आल्यानंतर ती मयत झाली आहे. याबाबत घटनास्थळावर जाऊन खात्री न करताच मुलीच्या घरी जाऊन तिच्या बहीण व भावास मुलगी ही या जगात राहिली नाही असे सांगितले. त्यापूर्वी त्याने चित्रपट व वाहिन्यांवरील मालिकांमध्ये दाखवितात. त्याप्रमाणे मुलीचा खून, पुरावे नष्ट केले. आपल्याला काहीच माहीत नाही, अशा अविर्भावात तो शोध मोहीमेत वावरत होता.
मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो सुटू शकला नाही अन् अलगद तावडीत सापडला. फिर्यादी यांनी नमूद केलेले तीन संशयित आरोपी यांचा नमूद गुन्ह्यात सहभाग नसल्याने तसा अहवाल न्यायालयात पाठवला आहे. त्यामुळे ते लवकरच सुटतील असेही पोलिसांनी सांगितले. पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील, सहायक आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रकाश धस, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक विजय जगदाळे, उपनिरीक्षक भाऊ डुबे, पोलीस हवालदार सुरेश हिंगे, विठ्ठल कुंभार, राजू जाधव, पोलीस नाईक संजय जरे, अनिल गोरड, बापू सोनवणे, हनुमंत कांबळे, वीरसेन गायकवाड, पोलीस हवालदार प्रदीप काळे, मनोज साबळे, नितीन गुंजाळ, निखील वरपे अशोक दिवटे, मच्छिंद्र भांबुरे, उद्धव गरजे यांनी ही कारवाई केली.