पुणे : साडेबारा लाखांची घरफोडी करून सोलापूरला पळून जात असलेल्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या युनिट-पाचच्या पथकाने सापळा लावून पकडले आहे. ही कारवाई हडपसर भागात करण्यात आली असून जयवंत गोवर्धन गायकवाड उर्फ जयड्या (32, रा. आंबेडकर वस्ती, औंध,पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.चोरीचे दागिने आरोपीने बॅंक लॉकर मध्ये ठेवले होते पोलिसांनी ते जप्त केले आहेत. यापूर्वी आरोपीवर घरफोडीचे सुमारे 80 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली आहे.
युनिट-पाच कडील पोलीस हवालदार अजय गायकवाड व पोलीस हवालदार चेतन चव्हाण यांना येरवडा जेलमधून नुकताच सुटलेला वरील आरोपी जयवंत गायकवाड याने नुकतीच मोठी घरफोडी केली असून तो सोलापूर येथे जाण्यासाठी हडपसर येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यानुसार युनिट-5 कडील पोलिसांनी आरोपी येण्याच्या मार्गावर सापळा लावून आरोपीस पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीस त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर सखोल चौकशी केली असता शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत एक घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली.
त्या गुन्ह्यातील सुमारे 12 लाख 60 हजार रुपये किंमतीचे 28 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे करीत आहेत.