पुणे- पूर्वी झालेल्या भांडणातून तरुणावर कोयत्याने वार केले. त्यानंतर डोक्यात दगड घालून त्याला कॅनॉलमध्ये ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार स्वारगेट परिसरात मंगळवारी रात्री घडला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम प्रकार रोकडे (वय 24, रा. शाहू वसाहत, पर्वती दर्शन) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी प्रेम उर्फ टकल्या प्रताप परदेशी (वय 25), ओंकार उर्फ पप्पू शंकर जोशी (वय 22, रा. शिवदर्शन), अक्षय उर्फ गोट्या रामदास लोळे (वय 22 , रा. पर्वती दर्शन) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम व आरोपी प्रेम व ओंकार हे चांगले मित्र आहेत. दोन दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून ओंकार सोबत शुभमची भांडणे झाली होती. त्याचा राग मनात धरून आरोपींनी मंगळवारी रात्री शुभमला दारु पिण्यासाठी बोलवून घेतले.
त्यानंतर गुटखा खाण्यासाठी त्याला स्वारगेट येथील कॅनॉल परिसरात घेऊन गेले. त्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी का भांडण केले होते, असे विचारणा करून शुभमच्या डोक्यात आणि हातावर वार केले. त्यानंतर त्याला कॅनॉलमध्ये ढकलून दिले. त्यानंतर आरोपी पसार झाले. नागरिकांनी शुभमला बाहेर काढले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तिघांना अटक केली. आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहेत. याप्रकरणी स्वारगेट पोलीस अधिक तपास करत आहेत.