Crime | पिंपरीतील व्यवसायिकाचे अपहरण करून महाडमध्ये खून

महाडमध्ये सापडला मृतदेह, नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप

पिंपरी (प्रतिनिधी) – मोरवाडी, पिंपरी येथील व्यवसायिकाचे गुरुवारी (दि. 4) राहत्या घरापासून अपहरण करून खून करण्यात आल्याचा प्रकार आज उघडकीस आला. अपहरण केल्यानंतर दोन दिवसांनी शनिवारी (दि. 6) त्यांचा मृतदेह महाड येथे पाण्यात सापडला. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल न करता केवळ बेपत्ता असल्याची फिर्याद घेतली. तसेच तपासातही वेळकाढूपणा केला, असा आरोप मृत व्यक्‍तीच्या भावाने केला आहे.

आनंद साहेबराव उनावणे (वय 45, रा. नर्मदा बिल्डींग, म्हाडा कॉलनी, मोरवाडी, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ विष्णू उनावणे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे.

पोलीस उपायुक्‍त मंचक इप्पर यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीटफंडचा व्यवसाय असलेला भाऊ बेपत्ता असल्याची माहिती मयत आनंद यांच्या भावाने पोलिसांना दिली. त्यानुसार बेपत्ता असल्याचा फिर्याद घेतली आहे. यामुळे पोलिसांनी मयत आनंद यांच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स काढले. मिळालेल्या लोकेशनवर शोधण्याचा प्रयत्न केला. आमचा शोध सुरू असतानाच आम्हाला आणखी एक माहिती नातेवाईकांकडून मिळाली की एक अनोळखी मृतदेह महाड येथे मिळाल्याचे महाड पोलिसांनी सांगितले आहे.

महाड पोलिसांनी पाठविलेले फोटो आणि मयताचे फोटो मिळते जुळते वाटल्याने पोलीस आणि आनंद यांच्या नातेवाइकांना महाड येथे रवाना केले. नातेवाईकांनी मृतदेह आनंद यांचाच असल्याचे सांगितले आहे. बेपत्ताची तक्रार आल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या अँगलने तपास केला. आजही त्यांचा मोबाइल वेगळेच लोकेशन दाखवत आहे. तर मृतदेह वेगळ्या ठिकाणी मिळून आला आहे. लवकरच आम्ही आरोपींना शोधून काढू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

पोलिसांकडून दमबाजी….

दरम्यान, आपल्या भावाचे अपहरण झाल्याचे पोलीस अधिकाऱ्यांना सांगत होतो. मात्र तुझा भाऊच लोकांचे पैसे घेऊन पळाला असेल, अशी खिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी उडविली. एवढेच नव्हे तर याला लई भावाची काळजी आहे त्यामुळे याचाच सीडीआर काढा, असा दमही पिंपरी पोलिसांनी दिला, असा आरोपी मयत आनंद यांचा भाऊ विष्णू उनावणे यांनी केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.