अवैध व्यावसायिकांनी धंदे शहरातून गुंडाळले; माफियांची धाव आता लोहमार्ग हद्दीतही
– संजय कडू
पुणे – शहरात पोलिसांचा वचक कायम ठेवण्यासाठी आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हेगार आणि अवैध व्यावसायिकांवर छापासत्र (क्राइम पेट्रोलिंग) सुरू केले आहे. या माफियांना स्थानिक पोलीस ठाण्याने अभय दिले, तरी गुन्हे शाखा कारवाई करत आहे. यामुळे अवैध धंदेवाल्यांचे बस्तान बसेनासे झाले आहे. सतत कारवाईच्या ससेमिऱ्यामुळे या धंदेवाल्यांनी शहरातून काढता पाय घेत लोहमार्ग पोलीस आणि ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत बस्तान बसवले आहेत.
शिवाजीनगर, खडकी हद्दीत “डाव’
शहरातील अवैध धंदेवाल्यांवर कारवाईसाठी पोलीस आयुुक्तांनीच कंबर कसली आहे. उपायुक्तांचा “फॉलोअप’ घेऊन अवैध धंदेवाल्यांवर कारवाई केली जात आहे. एका झोनच्या उपायुक्तांना दुसऱ्या झोनमध्ये कारवाईसाठी पाठवले जात आहे. यामुळे स्थानिक पोलिसांचा आशीर्वाद असलेल्यांनाही चाप बसला आहे. गुन्हा तर दाखल होतोच, पण मालही जप्त होत आहे. सतत कारवाई होत असल्याने बेकायदा धंदेवाल्यांचे “दुकान’ बसले आहे. यामुळे जुगार आणि पत्ते यांसारखे बेकायदा धंदे चालवणारे लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत घुसले आहेत. सध्या शिवाजीनगर आणि खडकी रेल्वे मार्गालगत छुप्या पद्धतीने हे “डाव’ सुरू आहेत.
कोरेगाव पार्क सुनेसुने
कोरेगाव पार्क हा उच्चभ्रू परिसर सदैव पब आणि नाइट पार्टीने गजबजलेला असायचा. पण, आता मात्र रात्रीच्या वेळी येथील रस्ते सुनेसुने दिसत आहेत. येथील पब आणि नाइट कल्चर आता लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत बहरू लागले आहे.
गृहमंत्र्यांचे विधान खरे ठरो..
“राज्यात ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दी हुक्का पार्लर सुरू असेल, तेथील संबंधित पोलीस अधिकाऱ्याला जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल,’ असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले. त्यांच्या विधानानंतर पौड हद्दीतील हुक्का पार्लर बंद होतील, अशी आशा स्थानिकांना आहे.
ग्रामीण हद्दीत हुक्क्याचा “धूर’
पौड पोलीस ठाणे हद्दीत सध्या हुक्का पार्लर, बेकायदा दारू विक्री आणि वेश्याव्यवसाय फोफावला आहे. भूकम येथे मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर सुरू आहेत. काही पार्लरच्या बाहेर तर खाकी वर्दीचाच पहारा बघायला मिळतो. येथे येणाऱ्या तरुण ग्राहकांमुळे वाहतूक कोंडी बरोबरच इतरही अनेक समस्यांना स्थानिक गावकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.
“पेटी’ दिली, आता पाकीटही मिळेना
शहरातील मलईदार पोलीस ठाणे मिळवण्यासाठी मंत्रालयापासून सेटिंग लावून आलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. विशेषत: परिमंडळ 1 आणि 4 हद्दीत उपायुक्तांनीही वैयक्तिक लक्ष देत कारवाईचा बडगा उगारला आहे. ज्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आदेश ऐकत नाहीत तेथे उपायुक्त थेट प्रशिक्षणार्थी अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेऊन कारवाई करत आहेत. यामुळे मलईदार पोलीस ठाणे मिळवण्यासाठी पेटी मोजणाऱ्यांना एखादे पाकीट मिळवतानाही नाकीनऊ आले आहे. यामुळे संबंधित पोलीस अधिकारी सतत वरिष्ठांविरुद्ध त्रागा करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी एका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने थेट अतिवरिष्ठ अधिकाऱ्यालाच “हद्दीतील धंदे सुरू राहूद्यात, आम्ही काही चिंचोके देऊन येथे बसलो नाही’ अशा भाषेत उत्तर दिले होते.