पुणे – वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील कर्मचारी आणि त्याच्या एजंटवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. वारजे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी त्याने लाच घेतली होती. लाचेच्या उर्वरित रकमेसाठी त्याने तगादा लावल्यावर संबंधिताने याबाबत तक्रार केली होती.
विलास तोगे (वय 39, बक्कल नं. 4737, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन) आणि बाळासाहेब चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदाराच्या दुकानावर खंडणी विरोधी पथकाने यापूर्वी कारवाई केली होती. त्यात पोलिसांनी डीव्हीआर जप्त केला होता. यामध्ये अटक न करण्यासाठी तसेच डीव्हीआर परत करण्यासाठी तोगे याने 50 हजार रुपयांची लाच मागितली.
त्यातील 38 हजार रुपये घेतले होते. परंतु उर्वरित 12 हजार रुपयांची मागणी केल्यानंतर यातील तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यात पैशांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाईपोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, पोलीस शिपाई चिमटे, चालक राऊत यांनी केली.