नेवासा – नेवासा तालुक्यातील चांदा येथे लोहारवाडी रस्त्याजवळ कर्डिले वस्तीवर मंगळवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास भाऊसाहेब कर्डिले यांच्या घरात चोरी करण्यासाठी झालेल्या चोरट्यांना प्रतिकार केल्याने चोरट्यांनी केलेल्या धारदार शस्त्रांच्या हल्ल्यात 21 वर्षीय तरूण ओंकार कर्डिले याच्या गळ्याला वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला. तर दोन जण जबर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी रात्री 12 ते 1 दरम्यान शेतीवर पाणी देण्यासाठी रात्रीची वीज असते. त्यामुळे भाऊसाहेब कर्डिले हे बाहेर झोपले असता त्यांना चोरट्यांची हालचाल जाणवली. चोरांनी अर्चना व नर्बदा कर्डिले यांच्या अंगावरील दागिने ओरबाडले.त्यांच्या आवाजाने मुलगा बापू कर्डिले हा उठला. दोन चोरट्याने बांबूने हाणामारी सुरु केली. त्यांच्या आरडाओरड्याने शेजारी रहात असणारे त्यांचे भाऊ माध्यमिक शिक्षक गंगाधर कर्डिले आणि त्यांचा मुलगा ओंकार कर्डिले हे मदतीला पळत आले.
तोपर्यंत एक चोर पळाला दुसरा घरामागे कांद्याच्या शेतात पळत असतांना त्याला धरला आणि बेदम केली. त्याच्या ओरडण्याने अंधारात दबा धरून बसलेला चोर जोरात पळत आले. त्याने धारदार शस्त्राने सपासप वार केले बापू कर्डिले, गंगाधर कर्डिले आणि ओंकार कर्डिले घायाळ झाले. त्यावेळी मारहाण झालेला चोरटा पळून गेला. शेजारील वस्तीवरील लोकांनी जखमी तिघांना लगेच नगर येथे एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असता ओंकार गंगाधर कर्डिले (वय 21) याच्यावर उपचार सुरू असतांना निधन झाले. माहिती मिळताच सोनई पोलीस स.पो.नि सचिन बागुल आणि फौज फाटा तातडीने हजर झाले. घटनास्थळी दाखल झाले.
सहा महिन्यांत दुसरा खून
चांद्यात सहा महिन्यापूर्वी भरचौकात खून झाला. त्याचा आरोपी अजूनही पोलिसांना सापडला नाही. आता दुसरी घटना घडली. त्यामुळे नागरिक तसेच रात्रीची वीज असल्याने शेतकरी भयग्रस्त झाले आहे. या घटनेमुळे वाढत्या गुन्हेगारी विरोधात मराठा महासंघाचे नेते संभाजीराव दहातोंडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे यावेळी सांगितले.