हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची इंटरनेट कॉलद्वारे धमकी देणारा उत्तराखंड येथून जेरबंद

आर्थिक, सायबर शाखेच्या पोलिसांची कारवाई

पुणे – जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेतर्फे बोलत असून, हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे, अशी धमकी इंटरनेट (voip) कॉलद्वारे देणाऱ्याला आर्थिक आणि सायबर शाखेच्या पोलिसांनी देहरादुन, उत्तराखंड येथून जेरबंद केले. चंद्रमोहन सिंह सुरियाल (वय 34) असे त्याचे नाव आहे. त्याने नगर रस्त्यावरील हॉटेल फॉर पॉईंट येथे 6 मार्च रोजी सायंकाळी फोन करून ही धमकी दिली होती.

याबाबत हॉटेलचे डायरेक्‍टर कॉर्पोरेट अफेअर म्हणून कार्यरत असणाऱ्या विशाल पुजारी (रा. पिंपळे सौदागर) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. याबाबत पोलिसांनी इंटरनेट कॉलची सुविधा पुरविणाऱ्या विविध कंपन्यांकडे तपास केला. त्यानंतर माहिती मिळवून चंद्रमोहन याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून डी-लिंक कंपनीचे 1 राऊटर/मोडेम आणि दोन मोबाईल संच जप्त केले. देहरादून येथील न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. तेथे ट्रान्झींट रिमांड घेऊन पुण्यात आणून, पुढील कारवाईसाठी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

दरम्यान त्याच्याकडे केलेल्या तपासात तो उच्चशिक्षित असून, त्याचा मार्केट रिसर्चचा व्यवसाय असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने येथील नऱ्हे परिसरात राहणाऱ्या मित्राकडून साडेचार लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम परत करण्याबाबत मित्राने तगादा लावला होता. मात्र, त्याच्याकडे परत देण्यास पैसे नव्हते. या पार्श्‍वभूमीवर त्याने त्याचा एक मित्र हॉटेल फॉर पॉईंट येथे थांबला आहे. त्याला भेटण्यास जाण्याबाबत उसने पैसे घेतलेल्या मित्राला सांगितले. वास्तविक त्याचा कोणताही मित्र त्या हॉटेलमध्ये थांबला नव्हता. ही सत्यता उसने पैसे घेतलेल्या मित्राला कळू नये, यासाठी एका मोबाईल ऍप्लीकेशनद्वारे इंटरनेट कॉल करून हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचे सांगितल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, आर्थिक आणि सायबर शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस हवालदार अस्लम अत्तार, पोलीस कर्मचारी राजकुमार जाबा, शाहरूख शेख, संतोष जाधव यांनी ही कारवाई केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)