विम्याच्या पैशांसाठी भावानेच केला बहिणीचा खून

निनावी पत्रामुळे आठ महिन्यानंतर उकलले गूढ

पिंपरी – तब्बल आठ महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. विम्याची रक्कम आपणाला मिळावी, यासाठी सख्या भावानेच बहिणीचा खून करून अपघाताचा बनाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

जॉन डॅनियल बोर्डे (वय-40 रा. रहाटणी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संगीता मनीष हिवाळे (वय-44) असे खून झालेल्या दुर्देवी महिलेचे नाव आहे. ही घटना 9 सप्टेंबर 2018 रोजी वाकड येथे मध्यरात्री घडली होती. बोर्डे याने आपली बहीण संगीता हिचा आधी खून केला आणि नंतर तिचा हृदयविकाराचा झटका आल्याचा बनाव करत गाडीमध्ये घालून रुग्णालयात नेण्याचे नाटक केले. दरम्यान गाडीला आग लावून देऊन गाडी जळाल्याने अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला होता.

हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता यांच्या नावावर तीस लाखांचा विमा होता. तसेच संगीता यांच्याकडे असलेल्या रोख रक्कमेवरूनही जॉन सातत्याने संगीताशी वाद करत होता. सायमन यांच्या शाळेची फी भरण्यावरून संगीता आणि जॉन यांच्यात वाद झाला. या वादामध्ये जॉनने संगीताचे डोके जमिनीवर आदळल्याने संगीताचा त्यामध्ये जागीच मृत्यू झाला.

मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर जॉनने घटनास्थळावरून पळ काढला. थोड्यावेळाने पत्नीचा फोन आल्याचे दाखवित जॉन घरी आला व रक्तदाबामुळे संगीता जमिनीवर पडल्याचे सांगून तिला रुग्णालयात घेवून जाण्याचा बहाणा केला. सोबत आई व संगीताच्या मुलालाही घेतले. मोठ्या दवाखान्यात घेऊन जाऊ असे सांगून वाकड जकात नाका येथे गाडी आणली. गाडी बंद पडल्याचे नाटक करत भाचा सायमनला बोनेट उघडून त्यासमोर उभे केले.

जॉनची आई लघुशंकेसाठी लांब गेली असता त्याने संधी साधत संगीताच्या अंगावर आणि सीटवर पेट्रोल टाकून आग लावून दिली. आगीचा भडका उडाल्याने जॉन आपल्या भाच्याला घेऊन दूर पळाला. त्यानंतर त्याने पोलिसांनाही गाडीला सीएनजी असल्याने आग लागून मृत्यू झाल्याचे सांगितले.

मुलगा मात्र झाला पोरका

वडिलांच्या मृत्यूनंतर आईसोबत सायमन हा त्याच्या मामाकडे रहात होता. तो अकरावीत शिक्षण घेत आहे. मात्र मामाच्या या कृत्यामुळे त्याची आई देखील दगावली तर मामा तुरुंगात गेला. त्यामुळे तो पोरका झाला आहे.

सुरुवातीला जॉनचा बनाव कोणाच्याही लक्षात आला नाही. बहिणीची रक्कम आपल्याला मिळावी यासाठी त्याने सर्व प्रयत्न चालू ठेवले होते. दरम्यान हिंजवडी पोलिसांना अचानक एक निनावी पत्र आले. संगीता यांचा अपघाती मृत्यू झाला नसून त्यांचा खून जॉन याने केल्याचे त्यात म्हटले होते. पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेत पुन्हा नव्याने तपास सुरू केला.त्यामध्ये धक्कादायक सत्य समोर आले. खूनातून स्वत:ची सोडवणूक करून घेण्यासाठी तसेच बहिणीची रक्कम आपल्याला मिळावी, यासाठी जॉननेच खून केल्याचे सत्य समोर आले. पोलिसांनी माहिती हातात येताच पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर जॉनने खुनाची कबुली दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.