पिंपरी – मित्राच्या आईला दुचाकीवरुन घेऊन चालेल्या एका तरुणावर चार जणांच्या टोळक्यांनी कोयता आणि लोखंडी रॉडने जबर मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना थेरगाव येथील धनगर बाबा मंदिराच्या मागील रस्त्यावर घडली.
बाबासाहेब महादेव वडमारे (वय 34, रा. कैलासनगर, थेरगाव) असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बहीण विशाखा महादेव वडमारे (वय 28, रा. कैलासनगर, थेरगाव) यांनी शनिवारी (दि.20) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चार हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी बाबासाहेब हा त्याच्या मित्राची आई अनिता भाट यांना सोमवारी (दि.15) रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास त्याच्या दुचाकीवरुन घरी घेऊन येत होता. यावेळी तो धनगर बाबा मंदिराच्या मागे आला असता अज्ञात चौघा हल्लेखोरांनी बाबासाहेब यांची दुचाकी अडवली. तसेच कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने डोक्यात पायांवर आणि हातांवर जबर मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.