पिंपरी – शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दहा लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना पुनावळे येथील मावळवाडी येथे बुधवार दि. 29 मे रोजी सकाळी साडेसात ते रात्री पावणेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली.
याप्रकरणी गितेश प्रकाश बोरगे (वय-26 रा. माळवाडी,पुनावळे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गितेश बुधवारी आपल्या कुटुंबियांसह सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यांनी घराला दोन कुलूपे लावलेले होते.
चोरट्याने घरात कोणी नसल्याचे पाहून दोन्ही कुलुपे बनावट चावीने उघडली. घरातील बेडरुमधील कपाटातील 9 लाख 60 हजार रुपयांचे 33.5 तोळे सोन्याचे दागिने व रोख 1 लाख 5 हजार रुपये असा 10 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास गितेश घरी परतल्यानंतर हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ हिंजवडी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पगारे करीत आहेत.