पिंपरी – रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणावर अज्ञात इसमाने गोळी झाडली. यामध्ये तरुण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. ९) रात्री अकराच्या सुमारास आनंदनगर, जुनी सांगवी येथे घडली.
आनंद ललित कुमार सोलंकी (वय ३०, रा. स्पायसर कॉलेज रोड, जुनी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. पोलिस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी आनंद हे मोबाईलवर बोलत रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, अज्ञात इसमाने पाठीमागून त्यांच्यावर गोळी झाडली.
गोळी त्याच्या कानाला लागली आहे. सोलंकी यांना औंध येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.