रश्मी शुक्ला, हाजिर हो! मुंबई सायबर पोलिसांनी बजावला दुसऱ्यांदा समन्स

मुंबई – गेल्या महिन्यात फोन टॅपिंग प्रकरणामुळं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. या प्रकरणाचे धागेदोरे वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यापर्यंत असल्याची चर्चा मध्यमांमध्ये सुरू होती. त्यातच सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवून २८ एप्रिलला जबाब नोंदविण्यासाठी मुंबईत उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. यावर शुक्ला यांनी मेल पाठवून सध्याच्या स्थितीत चौकशीला उपस्थित राहणं शक्य नसल्याचं म्हटलं होते. यातच पुन्हा एकदा सायबर पोलिसांनी साेमवार, ३ मेपर्यंत मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी हजर राहावे, असे त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावण्यात आले आहेत.

यापूर्वी, शुक्ला यांनी इमेल पाठवून म्हणाल्या होत्या की, सध्याची कोविड स्थिती आणि हैद्राबादमधील कामाचा व्याप पाहता मुंबईला प्रवास करून चौकशीला उपस्थित राहणं शक्य नाही. मात्र चौकशी संदर्भातील प्रश्नावली मला पाठवून द्या, मी संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. तसेच या प्रकरणी दाखल एफआयआरची प्रतही पाठवून द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. शुक्ला यांनी त्यांचा मेल आयडी आणि लँडलाईन क्रमांकही दिला आहे. आपण यावर उपलब्ध राहू असं त्यांनी मेलमध्ये सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुप्तचर विभागाच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या टॉप सिक्रेट कागदपत्रांचा दाखला देत, महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदलीचे रॅकेट उघडकीस आणले होते. फडणवीस यांनी असा आरोप केला होता की, काही एजंट्स आणि राजकीय नेत्यांच्या मदतीने अनेक पोलीस अधिकारी इच्छित पोस्टिंग मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. 25 ऑगस्ट 2020 रोजी तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी एका गुप्त माहितीच्या आधारे अतिरिक्त मुख्य सचिव गृह यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर काही फोन टॅप केले होते, ज्यात अनेक खळबळजनक गोष्टी उघडकीस आल्या होत्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

शुक्ला या प्रतिनियुक्तीवर केंद्रीय राखीव पोलीस दलात अप्पर पोलीस महासंचालक म्हणून हैदराबाद येथे कार्यरत आहेत. त्यांनी कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चौकशीला मुंबईला येण्यास नकार दिला. त्याऐवजी दाखल एफआयआरची प्रत व चौकशीतील प्रश्नांची यादी पाठवून द्यावी, असे उत्तर त्यांनी पहिल्या नोटीसला पाठविले होते. पोलीस मात्र त्यांनी स्वतः हजर राहून जबाब द्यावा, यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे त्यांना सोमवारपर्यंत चौकशीसा हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.