आळेफाटा : बुधवार, दि. २ जुलै २०२५ रोजी रात्री १०:१५ वाजता राजुरी गावच्या हद्दीत सह्याद्री व्हॅली इंजीनियरिंग कॉलेजसमोर एसटी बस आणि महिंद्रा बोलेरो पिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पिकअप चालकाचा मृत्यू झाला.
मृत चालकाचे नाव विनायक बाजीनाथ पंडित (वय ३५, रा. सातपूर कॉलनी, नाशिक) असे आहे. कल्याणहून साकोरीकडे निघालेली एसटी बस (क्रमांक एमएच २० बीएल ३१०६) राजुरी येथे पोहोचली असताना, आळेफाट्याकडे जाणाऱ्या महिंद्रा बोलेरो पिकअपने (क्रमांक एमएच १५ एचएच ८०१७) नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली.
या अपघातात पिकअप चालक विनायक पंडित गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नारायणगाव आगार प्रमुख आरगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी बसातील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. या घटनेचा पुढील तपास आळेफाटा पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.