पोटच्या मुलांच्या भेटीसाठी ‘त्याने’ कवटाळले मृत्यूला

विभक्‍त राहणाऱ्या पत्नीने नाकारली भेट : सासरच्या मंडळींनीही केली मारहाण

पिंपरी  – घरगुती वादातून विभक्त राहणारी पत्नी मुलांसह एका लग्न सोहळ्यासाठी पाहुण्यांच्या घरी आली. मुलांच्या ओढीने पित्याने पाहुण्यांचे घर गाठले. मात्र, तेथे त्याला मुलांना भेटू दिले नाहीच, उलट सासरच्या मंडळींनी मारहाण करीत धमकाविले. एवढेच नव्हे तर या लग्न सोहळ्याला येण्यास मज्जाव करण्यात आला. यातून आलेल्या नैराश्‍यातून अखेर त्याने गळफास घेत मृत्यूला कवटाळले. ही हृदयद्रावक घटना पिंपळे गुरव येथे आज (रविवारी) समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी आजच बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुरेश मुत्ताना लोखंडे (वय-35, रा. पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा भाऊ विनोद याने दिलेल्या फिर्यादीवरुन समाधान शिंदे, सचिन शिंदे (दोघे. रा. चाकण), साडू महेश लोखंडे, गणेश लोखंडे व मयताची सासू दुर्गाबाई शिंदे या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवावर गुन्हा

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या गणेश लोखंडे याचे दि. 19 मे रोजी चाकण येथे लग्न होते. या लग्नाच्या कार्यक्रमासाठीच मयत सुरेश यांची पत्नी पिंपळे गुरव येथे आल्यानंतर हा वाद झाला होता. त्यानंतर काल सुरेश यांनी लग्नाच्या एक दिवस अगोदरच गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुरेशचे दोन्ही मेहुणे यांच्यासह साडू महेश लोखंडे याच्यासह नवरदेव गणेश लोखंडे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत सुरेश आणि त्यांची पत्नी छाया हे दोघे विभक्त रहात होते. छाया ही आपल्या तीन मुलांना घेवून भावासोबत चाकण येथे माहेरी राहते. 19 मे रोजी सुरेश यांचे साडू महेश लोखंडे यांचा मुलगा गणेश लोखंडे याचे लग्न असल्यामुळे छाया ही आपल्या मुलांसह 15 मे रोजी महेश लोखंडे यांच्या घरी पिंपळे गुरव येथे आल्या होत्या. त्यावेळी सुरेश हे आपल्या मुलांना भेटण्यासाठी महेश लोखंडे यांच्या घरी गेले. त्यावेळी पत्नी छाया हिने मुलांना भेटू दिले नाही. त्यावरुन सुरेश यांचे मेहूणे, साडू, त्यांचा मुलगा व सासूमध्ये बाचाबाची झाली. सर्वांनी सुरेश यांना मारहाण केली होती.

त्यानंतर त्याच दिवशी रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास सुरेश याचे दोन्ही मेहुणे, साडू व त्यांचा मुलगा हे सुरेश यांच्या घरी आले “”आमच्या घरी लग्न असून तुझ्यामुळे लग्न कार्यात अडथळा यायला नको, लग्नानंतर आम्ही तुम्हाला बघून घेवू” अशी धमकी देवून निघून गेले. तसेच 17 मे रोजी सुरेश यांच्या दोन्ही मेहुण्यांना त्यांना भेटून “तु तिकडे मरुन जा, परंतु, आमच्या लग्नात येवू नको व पोरांना भेटू नको” असे म्हणाले. या सर्व गोष्टीमुळे सुरेश यांना आलेल्या मानसिक तणावातून त्यांनी काल (दि. 18) सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.