नोकरीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक

पाच महिने काम करुनही पगार नाही : “डिपॉजिट’च्या नावाखाली पैसे उकळले

पिंपरी – तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून “डिपॉजिट’च्या नावाखाली पैसे उकळण्याचा तसेच कामावर ठेवलेल्या तरुणांना पगारही न देता त्यांची 7 ते 8 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार चिंचवड येथील मयूर ट्रेड सेंटंरच्या विमाननगर शाखेमध्ये घडला आहे.

याप्रकरणी, प्रतीक सुरेश पवार (वय-30, रा. पिंपरी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन माधवबेंद्र प्रतापसिंग (वय-37, रा. लखनौ), चंद्रकांत मिश्रा (वय-40, रा. गौडा लखनौ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी फिर्यादी प्रतीक व इतर तरुणांना त्यांच्या कार्यालयात बोलावून घेतले व आम्ही गरजू मुलांना काम देतो असे सांगून फिर्यादीनी आणलेल्या कामगार मुलांकडून रिफंडेबल डिपॉझिटची रक्कम घेतली. तसेच फिर्यादी प्रतीक व त्यांच्या इतर साथीदाराकंडून पाच महिने काम करुन घेतले. मात्र त्यांचा पगार न देता त्यांची सात ते आठ लाख रुपयांची फसवणूक केली.

2 आयुक्तालय, चार पोलीस ठाण्यात फिरली तक्रार

या प्रकाराबाबत कामगारांनी 3 जून रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पिंपरी पोलिसांनी ही तक्रार घेतल्यानंतर गुन्ह्याचे कार्यक्षेत्र पुणे असल्याने ही तक्रार पुणे पोलीस आयुक्‍तकार्यालयामार्फत पुणे पोलिसांकडे पाठवण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपास केल्यानंतर पुन्हा गुन्ह्याचे कार्यक्षेत्र मोशी असल्याचे दाखवून ही तक्रार पुन्हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयातील भोसरी पोलीस ठाण्याकडे वर्ग केली होती. त्यानंतर भोसरी पोलिसांनीही तपास केला. त्यानंतर गुन्ह्यातील “मयूर ट्रेड’ हे ठिकाण निगडी पोलीस ठाण्याअंतर्गत असल्याचे सांगून हे प्रकरण निगडी पोलीस ठाण्यात वर्ग केले.

Leave A Reply

Your email address will not be published.