कामशेत – मोटार खरेदीच्या व्यवहारातून एकाने फसवणूक केली. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज हनुमंत पुजारी (वय 29, रा. पंडित कॉम्प्लेक्स, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.या प्रकरणी अर्जुन रामचंद्र कडमर (रा. दर्पण सोसायटी, येवलेवाडी, ता. मावळ, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 2) दुपारी एकच्या सुमारास अर्जुन याने सूरज याच्या मालकीची मोटार (एम. एच. 12 एम.आर. 5790) ही विश्वासाने घेतली. ठरलेल्या व्यवहारातील 40 हजार रुपये न देता तसेच स्वतःच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसताना शरद बॅंकेचे 11,960 रुपयांचे एकूण सहा धनादेश फिर्यादीला देऊन विश्वासघात केला. आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार समीर शेख तपास करीत आहेत.