पिंपरी – सावत्र सासू-सासऱ्यांचे घर दाखविण्याचा बहाणा करुन विवाहितेवर सावत्र दिरानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडकीस आली आहे. ही घटना शितळा नगर, देहुरोड येथे दि. 26 मे रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊच्या दरम्यान घडली. याप्रकरणी 19 वर्षीय विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावत्र दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला आरोपीने “तुझ्या सावत्र सासू-सासऱ्यांचे घर दाखवतो’ असा बहाणा करुन फुस लावून त्याच्या गाडीमध्ये बसवले व शितळानगर येथील सासू-सासऱ्यांच्या घरी नेले. तेथे फिर्यादी महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर या प्रकाराबाबत महिलेच्या पतीने आरोपीला विचारणा केली असता आरोपीने तिला व तिच्या पतीस शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नसून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवतळे करीत आहेत.