पिंपरी -जुन्या भांडणाचा राग मनात धरुन रिक्षाचालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून कोयत्याने वार केल्याची घटना रविवारी (दि.12) मोशी भाजी मार्केटजवळ दुपारी साडे चारच्या सुमारास घडली. शुभम असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल विश्वनाथ शिनगारे (वय 28, रा. मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, इस्तियाक खान, अक्षय उर्फ टकल्या सुदाम गायकवाड (वय 20), शुभम बाळू खरात वय 21, (दोघे रा. गांधीनगर मोशी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यांचा भाचा शुभम आणि तिघा आरोपींचे काही दिवसांपूर्वी रिक्षा हळू चालवण्यावरुन भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून रविवारी दुपारी साडे चारच्या सुमारास आरोपींनी शुभमच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी अक्षय आणि शुभम या दोघांना अटक केली आहे. तर इस्तियाक हा अद्याप फरार आहे.