पुणे – रिक्षातून आलेल्या चौघांच्या टोळीने एका बिहारी व्यक्तीस मारहाण करुन 35 हजाराची सोन्याची चेन लूटली. ही घटना कोंढवा येथील येवलेवाडी कमानीशेजारी शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
विशाल गोविंद वार(27,रा.आंबेगाव पठार), उमेश महादेव कानगुडे(21,आंबेगाव पठार), अक्षय प्रकाश पालकर(21,रा.आंबेगाव पठार) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार फरार आहे.
याप्रकरणी सुशिलकुमार सिंग(34,रा.कोंढवा, मुळ मुजफ्फुर, बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. सुशिलकुमार सिंग यांचा इलेक्ट्रीकचा व्यवसाय आहे. ते येवलेवाडी येथे पान खाण्यासाठी जात असताना कमानिशेजारी असलेल्या ऍटो रिक्षातील एकाने त्यांचा हात धरुन रिक्षात ओढले. यावेळी रिक्षात एकूण चार व्यक्ती होत्या. त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केल्यावर फिर्यादीने आरडा ओरडा केला. यामुळे एका आरोपीने हातातील कड्याने त्यांच्या तोंडावर तीन वेळा फाईट मारली.
त्याच वेळी एकाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून घेतली. यानंतर हे सर्वजन रिक्षातून कोंढव्याच्या दिशेने पळून गेले. यानंतर फिर्यादीने जवळील भंगार दुकानचालकास हा प्रकार सांगितला. फिर्यादीच्या डोक्यातून रक्त येत होते. भंगार दुकानचालक राजेश झा यांनी त्यांना तातडीने कोंढवा पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी फिर्यादीला ससून रुग्णालयात उपचार करण्यास पाठवले. सिटी स्कॅन केल्यानंतर बरे वाटन नसल्याने आराम करुन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे करत आहेत.