पिंपरी – मला दोन लाख रुपये दे अन्यथा तुमच्या मुलीची बदनामी करेन, अशी धमकी देणाऱ्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंग व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी पीडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली असून समीर चंद्रकांत सुर्वे (वय-30 रा.आंबेगाव, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलीचे लग्न झाले आहे. सदर आरोपी हा तिला सतत बोलण्याचा व भेटण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला मुलीने नकार दिला असता त्याने थेट मुलीच्या आईला फोन करत तुझ्या मुलीने माझ्याकडून दोन लाख रुपये घेतले आहेत. ते मला लवकर परत कर नाहीतर तिचे माझ्याशी लग्नापूर्वी अनैतिक संबंध होते, असे सांगून बदनामी करेन अशी धमकी दिली.
जानेवारी महिन्यापासून तो पीडीतेला व तिच्या आईला त्रास देत होता. यावरून पीडितेच्या आईने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली असून पुढील तपास करीत आहेत.