पिंपरी – बेकायदेशीर रित्या गाय व बैलाचे मांस विक्री करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 450 किलो वजनाचे मांस जप्त केले आहे. ही कारवाई दापोडी येथील गुलाब नगर येथे सोमवारी (दि.8) पहाटे चारच्या सुमारास करण्यात आली.
मुदस्सीर उर्फ इत्तु फय्याज कुरेशी (वय-32 रा. खडकी), मोसीन फय्याज कुरेशी (वय-28 रा.बोपोडी), मैहफुस फय्याज कुरेशी (वय-24 रा.बोपोडी) व शाकीर मज्जीद पठाण (वय-35 रा. खडकी बाझार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुदस्सीर व शाकीर हे रिक्षा चालक असून मोसीन व मुदस्सीर यांचे मांस विक्रीचे दुकान आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई समीर लक्ष्मण रासकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींकडून 1 लाख 12 हजार 500 रुपयांचे गायीचे व बैलाचे 450 किलो वजनाचे मांस जप्त केले. तसेच मांस कापण्यासाठी लागणाऱी शस्त्रे व मालवाहतूक टेम्पो असा एकूण 2 लाख 7 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलिसांनी आरोपींवर प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.