पुणे(प्रतिनिधी) – हडपसरमधील एका 19 वर्षीय टोळीप्रमुखाच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला आहे. संबंधीत टोळीने एका 16 वर्षाच्या मुलाच्या गालावर व डोक्यात चाकुने वार करुन जीवे ठार मारण्याच्या प्रयत्न करत दहशत पसरवली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार पिडीत 16 वर्षीय मुलगा 1 ऑगस्ट रोजी संध्याकाळी त्याच्या मित्रास भेटण्याकरीता त्याचे वडीलांचे मांजरी येथील गॅरेजवर गेला होता. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या भैय्या पानसरे व त्याचे इतर दोन अनोळखी मित्रांनी येवून गाडी पुसायला कापड मागितले. ते न दिल्यावरुन त्याचे गालावर, डोक्यावर चाकूने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पिडीत मुलाच्या मित्राचे वडील हे भांडणे सोडविणेसाठी गेले असता त्यांचेवरही चाकुने वार करुन जखमी केले होते.
याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाल्यावर टोळीप्रमुख आकाश दादासाहेब भापकर (19 रा.कवडीपाट हनुमान मंदिराजवळ लोणी काळभोर), योगीराज ऊर्फ भैय्या संदिप पानसरे(21,रा.स.नं.,काळुबाई वसाहत, माळवाडी, हडपसर), अभिजीत संजय सावंत (23,रा.फुरसुंगी) या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संबंधीत टोळीने स्वतःच्या टोळीचे वर्चस्व रहावे म्हणुन व अवैध मार्गाने आर्थिक फायदा व्हावा या करीता हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच तपासात संबंधीत टोळीवर हडपसर पोलीस ठाण्यात खंडणीची मागणी, हत्यारासह गंभीर दुखापत करणे असे एकुण पाच गंभीर गुन्हे दाखल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी उप-आयुक्त नम्रता पाटील यांचेमार्फतीने मोक्काचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांचे कार्यालयाकडे पाठविला होता. त्यांनी प्रस्ताव मान्य करुन तपास सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्याकडे सोपवला आहे. आतापर्यंत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत आतापर्यत 53 कारवाया करण्यात आलेल्या आहेत.