पुणे(प्रतिनिधी) – आंदेकर टोळी व सूरज ठोंबरे टोळीचा वर्चस्ववाद आहे. या वादातून एकमेकांवर हल्ला करण्याच्या घटना मागील काही दिवसांत घडल्या होत्या. यातील एका घटनेत आंदेकर टोळीचे वर्चस्व असलेल्या परिसरात जाऊन हातात कोयते फिरवत एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.
हा हल्ला टोळी प्रमुख सोमनाथ गायकवाड व सुरज ठोंबरे या टोळी प्रमुखांच्या इशाऱ्याने करण्यात आला होता. यातील सहभागी आरोपींवर मोक्का लावण्यात आला. मोक्का लावण्यात आल्यानंतर टोळीप्रमुख सोमनाथ सयाजी गायकवाड(36,रा.नानापेठ) हा फरार झाला होता. त्याच्या मुसक्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आवळल्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार युनिट एकच्या पथकातील पोलीस अंमलदार अमोल पवार, अजय थोरात, इम्रान शेख यांना सोमनाथ गायकवाड हा शिरवळ येथी बस स्थानकावर आला असल्याची खबर मिळाली होती. त्यानूसार पोलीस अंमलदार योगेश जगताप यांनी तांत्रीक विश्लेषण केले. या माहितीच्या आधारे सोमनाथ गायकवाडला सापळा रचून ताब्यात घेण्यात आला. त्याच्यावर दोन खुनाचे तसेच गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न, मारामारी, खंडणी असे 12 गुन्हे दाखल आहेत.
तो सध्या पुणे शहर व जिल्हयातून तडीपार आहे. त्याला मोक्का अंतर्गत सहायक पोलीस आयुक्त (फरासखाना) सतीश गोवेकर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी आदींच्या पथकाने केली.