राजगुरूनगर (प्रतिनिधी) : अल्पवयीन असलेल्या पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम वडिलांना राजगुरूनगर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. १२) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या खटल्याची माहिती अशी की, खेड तालुक्यातील दुर्गम गावात ८ फेब्रुवारी २०१८ रोजी वडिलांनी १३ वर्षीय मुलीवर वडिलांनी अत्याचार केल्याची नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली होती. खेड तालुक्यातील एका गावात नराधम वडील आई, दोन भाऊ आणि इयत्ता आठवीत शिकणारी पीडित मुलगी असा एकत्र परिवार राहत होता.
आई आणि एक भाऊ बाहेरगावी गेले असताना दारूच्या नशेत रात्री नराधम वडिलांनी आपल्या मुलीसोबत हे दुश्यकृत्य केले होते. लहान भावाशेजारी झोपलेल्या मुलीला लगतच्या खोलीत नेऊन नराधम पित्याने जीवे मारण्याची धमकी देत मुलीवर अत्याचार केला. मुलगी व आईच्या तक्रारीनंतर ११ फेब्रुवारीला आरोपीला खेड पोलिसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो येरवडा तुरुंगात आहे.
राजगुरूनगर सत्र न्यायालयात न्यायाधीश एस एन राजूरकर यांच्या कोर्टात हा खटला सुरू होता.सरकारी वकील व्ही. एन. देशपांडे यांनी पीडितेच्या बाजूने युक्तिवाद केला. या खटल्यात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित मुलगी, आई व डॉक्टर यांच्या महत्त्वाच्या साक्ष गृहीत धरून आरोपीला न्यायाधीश एस एन राजूरकर यांनी जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.