पुणे – परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवुन ४ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला १ जुनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
अनुप ढोरमले (वय ३१, रा. जतेगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी यापूर्वी एकाला अटक करण्यात आली असून त्याची जामीनावर सुटका केली आहे. याबाबत ३२ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. १४ ते ३१ जुलै २०२० या कालावधीत ही घटना घडली.
आरोपींनी फिर्यादीना विविध फोन नंबर वरून संपर्क साधून खोटी ओळख देत त्यांचा विश्वास संपादीत केला. त्यानंतर त्यांना परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फिर्यादीना विविध बँक खात्यात ४ लाख ६० हजार रुपये भरण्यास सांगितले.
पैसे देऊन देखील नोकरी न लावता तसेच घेतले पैसे परत न करता फिर्यादीची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अनुप याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली.