मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
माध्यमांशी बोलणं झाल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेत असल्याचे सांगितले. त्यावेळी संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचे पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालल्यानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे देशपांडे यांच्या खासगी वाहनात बसले. या वाहनात पोलीस बसण्याचा प्रयत्न करत असताना ही कार भरधाव वेगाने निघून गेली. या दरम्यान एक महिला पोलीस जखमी झाल्या. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना गुंगारा देत पळ काढल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
याप्रकरणानंतर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणि वेगाने वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस देशपांडे यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्यभरात पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. अनेक ठिकाणांहून मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही ठिकाणांहून भोंगे लावून आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.