पुणे – बायो डिझेल नावाने भेसळयुक्त केमिकलची विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने छापा टाकला. त्यांच्याकडून 150 लिटर भेसळयुक्त केमिकल आणी दोन टॅंकर असा 13 लाख 8 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सहायक पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना काही व्यक्ती बायो डिझेल नावाने भेसळयुक्त केमिकल विकत असल्याची खबर मिळाली होती. ही विक्री डुक्कर खिंड, कोंढवा येथील ढवळेश्वर ट्रांन्सपोर्ट, मांजरी बुद्रुक येथील ओम ट्रांन्सपोर्ट आणी लोणी काळभोर येथील बालाजी ट्रांन्सपोर्ट येथे होत असल्याचे समजले.
त्यानूसार वेगवेगळी पथके तयार करुन संबंधीत ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यानूसार डुक्कर खिंड येथे एक टॅंकर आढळून आला. त्याची तपासणी इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने केली असता भेसळयुक्त केमिकल द्रावण बायो डिझेल म्हणून विकत असल्याचे आढळले. येथून केमिकल असलेला टॅंकर व दुसरा एक टॅंकर आणी केमिकल जप्त करण्यात आले.
येथे पेट्राल पंपाप्रमाणे अल्ट्रेशन केलेल्या टॅंकरला नोझलची जोडणी करुन डिजीटल मीटरच्या सहाय्याने ग्राहकांना भेसळयुक्त बायो डिझेलची विक्री करण्यात येत होती. छापा टाकल्यावर पांडुरंग मरगळे (रा.कर्वेनगर) त्याची पत्नी तसेच पुरवठा, साठा, खरेदी विक्री करणारे, वितरण करणाऱ्यांविरुध्द वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस उपायुक्त बच्चनसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, झंजाड, सहायक फौजदार अनिल शिंदे, दिपक मते, पोलिस अंमलदार क्षिरसागर, वाळके, गोणते, गायकवाड, डिझोसा, तळेकर, कुंवर, भालचिम, साळुंखे, रावळ, कराळे, कांबळे व शेलार यांच्या पथकाने केली.