यशराज फिल्म्सविरोधात फसवणुकीप्रकरणी गुन्हा

मुंबई – मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बॉलिवूडमधील प्रोडक्‍शन हाऊस यशराज फिल्म्सविरोधात 100 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा द इंडियन परफॉर्मिंग राईट्‌स सोसायटीच्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे.

आयपीआरएस ही संस्था गीतकार, संगीतकार, गायक आणि संगीत निर्मात्यांचे प्रतिनिधित्व करते. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यशराज फिल्म्सने कलाकारांना काही संशयास्पद करारांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले आणि त्यांना रेडियो स्टेशन्स, संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरुन मानधन घेण्यासही मज्जाव केला.

प्राथमिक तपास आणि पुराव्यांच्या आधारे यशराज फिल्म्स आणि त्यांचे सर्वेसर्वा असलेले आदित्य चोप्रा, तसेच उदय चोप्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरु असून गरज पडल्यास आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्याने दिली.

त्याशिवाय, जर इतर कुठलंही प्रोडक्‍शन हाऊस आणि स्टुडिओ अशा प्रकारच्या प्रकरणात गुंतलेले आढळले, तर त्यांचीही चौकशी केली जाईल, असेही अधिकारी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.