राजगुरूनगर : खेड तालुक्यातील एका गावात मुंबईतील रेड झोन मधुन आलेल्या एका कुटुंबातील २ व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांनाही राजगुरूनगर येथील वसतिगृहात संस्थात्मक विलीगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती सभापती अंकुश राक्षे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. देशात करोना विषाणू संसर्ग वाढत आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली आहे. खेड तालुक्यात अजुनपर्यंत एकही करोनाबाधित रुग्ण सापडला नाही.
याबाबत प्रशासनाने खबरदारी घेतली आहे तर नागरिकांनीही काळजी घेतली आहे. मात्र भविष्यात असे घडू नये यासाठी प्रशासन प्रभावी उपायोजना राबवत आहे. लॉकडाऊनच्या काळात बाहरेगावच्या लोकांना तालुक्यात प्रवेश नाही. तर, तालुक्यातील नागरिकांनाही बाहेर जाण्यास परवानगी नाही. त्यातच रेड झोन असलेल्या मुंबई आणि पुणे, पिंपरीचिंचवड आदी भागातील नागरिकांना तालुक्यात येण्यास सक्त मनाई करण्यात आहे. तरीही तालुक्यात प्रशासनाला चकवा देत अनेकजण मुंबई पुणे येथून येण्याचे प्रयत्न करीत आहेत. तर, काही जण गावांमध्ये ते आलेही आहेत.
त्यांची माहिती स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनाकडे दिली जात नाहीय. माहिती लपवून ठेवणाऱ्याचा स्वतः ग्रामस्थ शोध घेत आहेत.काही जण बळजबरीने गावात प्रवेश करतात अशा नागरिकांना प्रशासनाने क्वारंटाईन करण्याची भूमिका घेतली आहे. रेड झोन मधून आलेल्या व्यक्तीवर तत्काळ सरकारी आदेशन पळाल्याप्रकरणी (लॉकडाऊनचे उल्लंघन) भादंवि कलम १८८ अनव्ये कारवाई केली जात आहे. अशा व्यक्तींना राजगुरूनगर येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन(संस्थात्मक विलीगीकरण) कक्षात घेण्यात येणार आहे.
आज पंचायत समितीचा आरोग्यविभाग व पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मुंबईतील रेड झोन मध्ये राहणाऱ्या दोन व्यक्ती गावात आल्या होत्या. त्यांच्यावर १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती या मुंबई येथील रेड झोन मधील सील केलेल्या बिल्डिंग मधून शासनाला चकवा देऊन खेड तालुक्यातील एका गावात आल्या आहेत. त्याची माहिती ग्रामस्थानी तालुका आरोग्य विभाग व पोलिसांना दिली होती. त्याची तत्काळ दखल घेत त्यांना शासनाने सुरु केलेल्या राजगुरुनगर येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन(संस्थात्मक विलीगीकरण) ठेवण्यात आले आहे. तालुक्यात बाहेरगावरून आलेल्या व्यक्तींवर ग्रामस्थांनी तर शहरात शेजारी व सोसायटी मधील नागरिकांनी नजर ठेवावी व करोना विषाणू संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले कि, करोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी तालुक्यात पुणे मुंबई पिंपरी चिंचवड या रेड झोन मधून येणाऱ्या नागरिकांना सरकारी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन(संस्थात्मक विलीगीकरण) ठेवले जाणार आहे. आज दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे उद्यापासून ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. आपल्या गावात आपल्या सोसायटीत पुणे मुंबई सह बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांची तात्काळ माहिती प्रशासनाला नागरिकांनी द्यावी करोना संसर्गावर मात करण्यासाठी सर्वानी सहकार्य करावे.
सभापती अंकुश राक्षे यांनी सांगितले कि, तालुक्यात करोना संसर्ग टाळण्यासाठी पुणे मुंबई आदी रेड झोन मधून खेड तालुक्यात येणाऱ्या नागरिकांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन(संस्थात्मक विलीगीकरण) केले जाणार आहे. त्यासाठी तालुक्यातील १४ वसतिगृहात सुमारे १२०० नागरिकांची व्यवस्था होईल असे सुसज्य इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन(संस्थात्मक विलीगीकरण) कक्षाची निर्मिती केली आहे. आपल्या गावात परिसरात बाहेरगावरून विशेषतः रेड झोन मधून आलेल्या नागरिकांची माहिती ग्रामस्थानी तात्कळ प्रशासनाला द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.