विनापरवाना गावात आलेल्या जावयासह तिघांवर गुन्हा 

मुंबई ते भाळवणी केला प्रवास ः कुटुंबातील महिला करोना संशयीत 

पारनेर  -पारनेर तालुक्‍यातील भाळवणी येथे मुंबईवरून एक कुटुंब विना परवाना भाळवणी येथे आले. यातील एका महिलेस करोना संशयीत म्हणून मुंबई येथे प्रशासनाने निगरानी खाली ठेवले होते. मात्र कुठलीही परवानगी न घेता ही महिला कुटुंबासह भाळवण येथे आल्याची माहिती मिळताच प्रशासनाने या कुटुंबात ताब्यात घेऊन त्यांना तपासणीसाठी नगरला पाठविले. तसेच ग्रामसुरक्षा समितीच्या फिर्यादीवरून तिघा जणांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई येथून एका कुटुंबातील सात सदस्य भाळवणी येथे आले. या कुटुंबातील एका महिलेस करोनाची लक्षणे आढळली होती, म्हणून तिचा स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र त्याचा अहवाल येण्यापूर्वीच ही महिला आपल्या कुटुंबास भाळवणी येथे आली. मुंबई येथे या महिलेबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता, ती नगर येथे आल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी तत्काळ जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर भाळवणी येथे या कुटुंबाची आरोग्याधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात स्त्राव चाचणी करण्यासाठी पाठवले आहे.

दरम्यान, हे कुटुंब मुंबईहून बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची शंका आल्याने रातोरात भाळवणी येथे आले होते. तसेच येताना तपासणी नाके चुकवत ते भाळवणीत पोहोचले होते. मात्र येथे आल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. त्यांनी करोना काळामध्ये नियमांचे उल्लंघन केले म्हणून ग्रामसुरक्षा समितीच्या अध्यक्ष सरपंच लीलाबाई रोहोकले, उपसरपंच संदीप ठुबे, सचिव ग्रामविकास अधिकारी संपत दातीर, मंडल अधिकारी दीपक कदम, कामगार तलाठी शशिकांत मोरे यांच्या समितीने संबंधित तीन व्यक्तींवर पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे.

दरम्यान, पारनेर तालुक्‍यातील टाकळी ढोकेश्वर येथील 36 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली होती. त्याच कुटुंबातील सात जणांचे स्त्राव करोना चाचणी पाठवण्यात आले होते. त्यातील सहा अहवाल निगेटिव्ह आले असून, एका अहवालाची प्रतीक्षा आहे. तसेच म्हसणे येथील करोनाबाधित असलेला जावई नगर येथे बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. त्याची प्रकृती चांगली असून, त्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.