बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा

जामखेडमधील बड्या हस्तीचा समावेश असल्याचा संशय

जामखेड  – अकलूज येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करुन स्त्री जातीचा गर्भ असल्याचे माहीत होताच जामखेड येथील मेडिकलमधून बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या घेऊन चार महिन्यांचा गर्भपात केला. या प्रकरणी एकूण सहा जणांना विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मच्छिंद्र वायफळकर, शिवाजी कपणे, पाटील (पूर्ण नाव माहीत नाही. रा. अकलूज) व दोन महिलांसह गर्भनिदान करण्यासाठी मदत करणारे इतर डॉक्‍टर अशा, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील आरोळेवस्ती येथे एका कुटुंबातील विवाहितेने अकलूज येथील एका गावातील पाटील नावाचा इसम (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याकडे 31 ऑक्‍टोबर ते 9 नोव्हेंबरदरम्यान बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करुन घेतली.

या तपासणीत सदर महिलेच्या पोटात स्त्री जातीचा गर्भ आसल्याचे सांगितले. त्यानंतर या कुटुंबाने जामखेड येथील एका मेडिकल चालकाशी संपर्कसाधून बेकायदेशीर गर्भपात करण्यासाठी गोळ्या खरीदी केल्या. गोळ्या घेतल्यानंतरही गर्भपात न झाल्याने त्या महिलेस त्रास होऊ लागल्याने तिला नातेवाईकांनी जामखेड येथील डॉ. युवराज खराडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

त्यानंतर डॉक्‍टरांना संशय आल्याने त्यांनी तातडीने सदर महिलेस नेमके काय प्रकरण आहे, असे विचारल्यानंतर या महिलेच्या कुटुंबीयांनी घडलेला प्रकार सांगितला. यानंतर डॉ. खराडे यांनी ही घटना जामखेड पोलिसांना सांगितली. त्यामुळे सदरचा गर्भपाताचा प्रकार उघडकीस आला.

ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकरी डॉ. युवराज खराडे यांनी जामखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, वरील सहा जणांविरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी मच्छिंद्र वायफळकर, शिवाजी कपणेसह तीन जणांना अटक केली असून, या तिघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)