उंब्रज – अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने पिकअप गाडीतून नेऊन तिच्यावर एका खाणीत बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी (दि. 13) रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी करण दत्तात्रय पवार (रा. पाडेकरवाडी, ता. पाटण) याच्यावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित अल्पवयीन मुलगी व आजी गुरुवारी (दि. 12) रात्री दहाच्या सुमारास घरात झोपल्या होत्या. मुलीचे आई-वडील शेतात पाणी द्यायला गेले होते. कोणी तरी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घराचा दरवाजा वाजवल्याने पीडित मुलगी घराबाहेर आली असता, करण पवारने तिला जबरदस्तीने पिक-अप गाडीत बसवून एक किलोमीटर अंतरावर खडीच्या खाणीजवळ नेले.
तेथे गाडीच्या हौद्यात तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी देऊन पीडितेला पुन्हा तिच्या घराजवळ सोडले. दरम्यान, शेतातून घरी आलेल्या आई-वडिलांना पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून करण पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सपोनि अजय गोरड तपास करत आहेत.