तीन हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसाविरोधात गुन्हा

वडूज पोलीस ठाण्यातील प्रकार; सुरेश हांगेला जामीन मंजूर

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी)
दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी तीन हजाराची लाच मागणार्‍या वडूज पोलीस ठाण्याअंतर्गत मायणी पोलीस दुरक्षेत्राचा पोलीस नाईक सुरेश गुलाब हांगे (रा. पळशी, ता. माण) याच्याविरोधात एसीबीने लाच मागणी केल्याप्रकरणी बुधवारी वडूज पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली अधिक माहिती अशी की , म्हासुर्णे (ता.खटाव) येथील एका व्यक्तीला त्याच्या सुनेने दाखल केलेल्या एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी हांगे याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर याप्रकरणी मंगळवार दि. 30 रोजी सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाच मागणीबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पडताळणी केली.

त्यात हांगे तीन हजाराची लाच मागत असल्याचे निष्पन्न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवार दि. 31 रोजी वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा लावला होता. त्यावेळी तक्रारदाराकडून तडजोडीअंती तीन हजाराची लाच मागणी करणाऱ्या हांगेला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्विकारण्यास नकार दिला.

त्यानंतर बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्याला ताब्यात घेत त्याच्यावर वडूज पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार लाच मागणी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबीचे डीवायएसपी अशोक शिर्के करत आहेत.

ही कारवाई डीवायएसपी अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साळुंखे, राजे, अडसूळ, ताटे, कर्णे, अडागळे, खरात, काटकर, भोसले यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.