नवी दिल्ली – कालीमातेच्या संदर्भात वादग्रस्त विधाने करून तृणमुल कॉंग्रेस या आपल्याच पक्षाला अडचणीत आणणाऱ्या खासदार महुआ मोईत्रा यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश पोलिसांनीही त्यांनी जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही तासांपासून एका डॉक्युमेंटरीची एक पोस्टर प्रचंड वादग्रस्त ठरले आहे. या पोस्टरमधील एक महिला काली देवीच्या अवतारात दर्शवण्यात आली असून ती सिगारेट ओढताना दिसते आहे. त्यामुळे बराच गदारोळ माजला असून कॅनडातील भारतीय दुतावासानेही याची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना कॅनडा सरकारला केल्या आहेत. विशेष म्हणजे ती डॉक्युमेंटरी भारतातल्या तामिळनाडूतील एका महिलेची असून तिने आपल्या या कृत्याचे समर्थन केले आहे.
या प्रकरणात आता तृणमुलच्या मोईत्राही सापडल्या आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी कालीमातेच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले आहे. तसेच आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना त्या म्हणाल्या की, की तुम्ही प. बंगालच्या वीरूभूम जिल्ह्यातील तारापीठ मंदिरात गेलात तर तुम्हाला तेथे साधु सिगारेट ओढताना दिसतील. हा त्यांच्या कालीपुजेचा भाग आहे.
एक कालीउपासक या नात्याने माझी काली माता कशी आहे याची कल्पना करण्याचे मलाही स्वातंत्र्य आहे. तुम्ही भूतान अथवा सिक्किम येथे गेलात तेथील भाविक त्यांच्या देवांना मद्याचा नैवेद्य दाखवतात. मात्र उत्तर प्रदेश अथवा बिहारमध्ये हा प्रकार अत्यंत निषिध्द मानला जातो.
दरम्यान, मोईत्रा यांच्या या विधानांचा त्यांच्या पक्षाने निषेध केला आहे. ते कालीमातेबद्दल त्यांचे स्वत:चे मत असू शकते. पक्षाला त्याच्याशी कोणतेही देणेघेणे नाही व आम्ही त्याचे समर्थनही करत नाही असे तृणमुलने म्हटले आहे.
नुपूर शर्मा प्रकरणामुळे वादात सापडलेल्या भारतीय जनता पार्टीने हा मुद्दा लगेचच उचलून घेत मोईत्रा आणि तृणमुलचा निषेध करत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर झालेल्या प्रकारामुळे अडचणीत आलेल्या मोईत्रा यांनी या सगळ्याचे खापर माध्यमांवर फोडले आहे.