पाचगणी (प्रतिनिधी) – मनसेचे युवानेते अभिषेक शिंदे यांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महाबळेश्वर पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी, येथील देवसरे कदम वस्ती पुलाच्या निकृष्ठ दर्जाच्या बांधकामासंदर्भात मनसे नेते अभिषेक शिंदे यांना आलेल्या पत्राची शहानिशा करण्यासाठी ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात गेले होते. यावेळी सभापती संजय गायकवाड व सुभाष कारंडे यांनी अभिषेक शिंदे यांना कार्यालयाबाहेर अडवून तुझा कदमवस्ती पुलाच्या कामाशी काहीही संबंध नाही, तू यामध्ये पडू नको असे म्हणत दमदाटी व शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली.
दरम्यान, मारहाणीत बरगडीला मार लागल्याने अभिषेक शिंदे यांच्यावर महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात संजय गायकवाड व राष्ट्रवादीचे नेते सुभाष कारंडे यांच्या अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत करत आहे.