“हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ कादंबरीतील लिखाणावर आक्षेप
भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
पिंपरी – साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे “हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ हे पुस्तक पुन्हा एकदा वादात अडकले आहे. दहा वर्षांपूर्वीच्या या पुस्तकातील काही मजकुरावर आक्षेप घेत ऍड. रमेश खेमू राठोड (वय 35, रा. शांती नगर, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भालचंद्र नेमाडे यांच्या “हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ या पुस्तकात नेमाडे यांनी लमाण समाजाच्या महिलांबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे.
ऍड. राठोड म्हणाले, “भालचंद्र नेमाडे यांनी पुस्तकात आक्षेपार्ह लिखाण केले आहे. संबंधित प्रकाशक आणि लेखक यांनी “हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ हे पुस्तक माघारी घ्यावे. तसेच लमाण समाजाची माफी मागावी.
भालचंद्र नेमाडे यांची “हिंदू-जगण्याची समृद्ध अडगळ’ हे पुस्तक सन 2010 साली प्रकाशित झाले. दरम्यान या कादंबरीबाबत अनेक साधक-बाधक चर्चा झाल्या. मात्र, पुन्हा हे पुस्तक वादात अडकले असून पुस्तक पूर्णपणे माघारी घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.