पिंपरी – पत्नीचा छळ करुन गर्भपाताची औषधे देऊन तिचा गर्भपात केल्याप्रकरणी नेहरुनगर येथील “गोल्डमॅन’ सनी वाकचौरे याच्यासह कुटुंबातील चार जणांवर चिंचवड ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सनी नाना वाकचौरे (वय 31), सासू आशा नाना वाघचौरे (वय 56), सासरे नाना वाघचौरे (वय 60), नणंद नीता गायकवाड (वय 36, सर्व रा. संतोषीमाता मंदिर चौक, नेहरूनगर, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत विवाहितेने गुरुवारी (दि. 22) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 23 मार्च 2011 पासून 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घडला.
आरोपींनी विवाहितेकडे तिच्या आई-वडिलांकडून गृहपयोगी वस्तू आणण्याची मागणी केली. त्यानुसार विवाहितेच्या आई-वडिलांनी वस्तू दिल्या. त्यानंतर पती सनी याने बाहेरील स्त्रियांशी संबंध ठेऊन विवाहितेला मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच विवाहितेला गर्भपाताची औषधे देऊन तिचा गर्भपात घडवून आणला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गोल्डमॅन अशी सनी वाकचौरे याची ओळख आहे. किलोभर सोने अंगावर मिरविणाऱ्या सनीवर गृहपयोगी वस्तू आणण्यासाठी छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.