पिंपरी – कार आणि एसटी बसच्या अपघातानंतर एकमेकांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भाजपा नगरसेविकेच्या मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
राज हेमंत तापकीर (रा. काळेवाडी, पुणे) असे अदखलपात्र गुन्हा दाखल झालेल्या नगरसेविकेच्या मुलाचे नाव आहे. अतुल ज्योतिराम सपकाळ (रा. वाकड, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर राज तापकीर यानीही परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. अतुल सपकाळ आणि त्यांच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज तापकीर हा भाजप नगरसेविका सुनीता तापकीर यांचा मुलगा आहे.
हिंजवडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीचालक राहुल आनंदराव उबाळे (वय 35) हे रविवारी सकाळी सव्वानऊ वाजता मुंबई-बेंगलोर हायवेने जात होते. ते कावेरी हॉटेल हिंजवडी येथे आले असता बस समोरील कारने (एमएच-46-एपी-1736) अचानक ब्रेक लावला. त्यामुळे एसटीचालकानेही ब्रेक मारून बस सुरक्षित अंतरावर थांबवली.
त्या वेळी बसमागून जात असलेले तापकीर याची (एमएच-14-एचवाय-0011) कार बसवर पाठीमागून आदळली. यामुळे कारचे बंपर, टेल लाईट, बाजूचा पत्रा याचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर राज तापकीर आणि सर्वात पुढील कारचालक यांच्यात हाणामारी झाली. त्यानुसार फिर्यादी राजदीप हेमंत तापकीर आणि अतुल ज्योतिराम सपकाळ यांनी एकमेकांच्या विरोधात परपस्पर गुन्हे नोंदविले आहेत.