माजी सलामीवीर व्ही.बी चंद्रशेखर यांची आत्महत्या

चेन्नई – भारताचे माजी सलामीचे फलंदाज व राष्ट्रीय निवड समिती सदस्य व्ही.बी चंद्रशेखर यांनी आत्महत्या केल्याचे येथील पोलिसांकडून सांगण्यात आले. मृत्युसमयी ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी व दोन कन्या असा परिवार आहे. सुरूवातीला ह्रदयविकाराने त्यांचे निधन झाल्याचे कळविण्यात आले होते. मात्र त्यांनी गुरूवारी आपल्या घरातच सायंकाळी 5.45 वाजता गळफास लावून आत्महत्या केली असावी असे पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.

चंद्रशेखर यांनी 1988 ते 1990 या कालावधीत एक दिवसाच्या 7 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यामध्ये त्यांनी केवळ 88 धावा केल्या. त्यांनी तामिळनाडूकडून खेळताना प्रथम दर्जाच्या 81 सामन्यांमध्ये 4 हजार 999 धावा केल्या. त्यामध्ये त्यांनी नाबाद 237 धावा ही वैयक्तिक सर्वोच्च कामगिरी केली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने 1987-88 मध्ये रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळविले होते.

त्यांनी चेन्नई सुपरकिंग्जला महेंद्रसिंग धोनी हा खेळाडू मिळविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तामिळनाडू लीगमध्ये व्ही.बी.कांची वीरान्स हा संघ विकत घेतला होता. व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. त्याचे दडपण घेत गेले काही दिवस ते खूपच मानसिकदृष्ट्या विवंचनेत सापडले होते. चंद्रशेखर यांच्या निधनाबद्दल सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, कृष्णम्माचारी श्रीकांत, सुरेश रैना, हरभजनसिंग आदी ज्येष्ठ खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.